Sexagenarian Pandit Omkarnath Thakur outperformed young Nazakat & Salamat Ali Khan (Calcutta 1956)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025
  • I could not find out 1956 Calcutta concert recording
    Below is a truncated write up from the Marathi book स्वरांची स्मरणयात्रा authored by Pandit Arvind Gajendragadkar:
    "संमेलनाची शेवटची रात्र. थिएटर गर्दीनं ओथंबून वाहत होतं. पाकिस्तानी बंधू नजाकत व सलामत प्रथमच गाणार होते. आणि त्यानंतर शेवटी गाणार होते, संगीत मार्तण्ड पं. ओंकारनाथ ठाकूर! हमखास बाजी मारणारे पंडितजी यंदा पण आपलं वर्चस्व कायम ठेवू शकतील का? या शंकेने त्यांचे चाहते नाही म्हटलं तरी जरा व्याकूळच झाले होते. पाकिस्तानी बंधूंच्या आक्रमक गाण्याची जबरदस्त हवा पसरली होती. ते तरुण होते. ऐन उमेदीत होते आणि पंडितजींचा नाही म्हटलं तरी सूर्य ढळत चालला होता. प्रत्येक चाहत्याला हीच काळजी लागून राहिली होती. पंडितजींचं गाणं कसं होणार? रात्री बाराच्या सुमाराला उस्ताद सलामत अली आणि नजाकत अली रंगमंचावर आले. खास पाकिस्तानी पोषाख, डोक्यावर गोंड्याची टोपी, चेहेऱ्यावर जरासा उर्मटपणाकडे झुकणारा बेदरकार आत्मविश्वास. श्रोत्यांना नम्रपणाने ‘आदाब अर्ज’ करून ते स्थानापन्न झाले. तबल्याला अनोखेलाल आणि सारंगीला गोपाल मिश्र होते. झडप घालण्यापूर्वी वाघ जसा सावधपणे बघतो तशा नजरेने सर्व गर्दीवरून नजर फिरवून त्या दोघांनी स्वर लावला. श्रोत्यांनी उस्फूर्त दाद दिली, ‘वाहव्वा! बहोत अच्छे!’ सुमारे दोन तास त्या दोघा बंधूंनी मालकंस राग अक्षरशः पिंजून काढला. अतिशय सुरेल आणि कसदार स्वर. अतूट मींडयूक्त आलापी, कल्पक आणि चमत्कृतीपूर्ण स्वरांचे रूपबंध! वजनदार गमकयुक्त ताना तर त्यांनी अशा ताकदीने घेतल्या की त्यांच्या आघाताने सारे थिएटर गदगद हलल्याचा भास झाला. गमकयुक्त तानेबरोबरच द्रुत आणि अतिद्रुत ताना सुद्धा त्यांनी अशा सफाईने घेतल्या की कधी विद्युल्लता तळपल्याचा भास झाला तर कधी भव्य वृक्षावरून चिमुकली खार सर्रकन गेल्याचा भास झाला. सरगमचे तर चमत्कृतीपूर्ण आणि चकित करणारे अनंत प्रकार त्यांनी घेतले. साडेतीन सप्तकाची तान घेऊन आणि तिची तिहाई करून त्यांनी सम गाठली तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यानंतर तर त्यांनी इतक्या प्रकारचे तिय्ये घेतले की अनोखेलालसारखा कसलेला तबलजी पण चक्रावून गेला. मालकंस रागातच त्यांनी शेवटी जलद एकतालात एक चीज आणि त्यानंतर एक तराना पेश केला. त्या वेळी तर द्रुत गतीतल्या तानांचा पाऊसच पाडला. सारे श्रोते त्या अद्भुत गायनाने चक्रावून गेले होते, भारावून गेले होते. एक अतिद्रुत तानेची तिहाई घेऊन त्यांनी मालकंस संपवला तेव्हा टाळ्यांची बरसात झाली. ‘जीते रहो! वाहवा! बहोत अच्छा!’ अशा उद्गारांनी सर्वांनी त्यांना दाद दिली. टाळ्या संपत असतानाच त्यांनी ठुमरीला सुरुवात केली. रसवत्ता, चमत्कृती आणि कल्पनारम्यता यांचा तो संगमच होता. त्यात त्यांनी आणखी एक गंमत केली. ठुमरीची दुगन करताना चक्क त्यांनी पाश्चात्त्य ढंगाचे स्वर घेतले. त्या नाविन्यपूर्ण स्वरांनी श्रोते अक्षरशः बेहोष झाले. भान विसरून अंगविक्षेप करीत नाचू लागले. काही ढुड्डाचार्यांनी या प्रकाराला नाकं मुरडली; पण बहुसंख्य श्रोते खूष होते. त्या बंधूचं गाणं संपलं तेव्हा पहाटेची चाहूल लागली होती. पंधरा मिनिटांच्या मध्यंतरानंतर संगीत मार्तण्ड पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचं गायन होईल अशी घोषणा झाली आणि श्रोते चहापाण्यासाठी घाईघाईने बाहेर पडले. चहापान आटोपून ताजेतवाने झालेले श्रोते जागेवर बसले तोच घोषणा झाली, “संगीत मार्तण्ड पंडित ओंकारनाथ ठाकुर राग देवगिरी बिलावल सादर करतील. साथीला पं. अनोखेलाल आणि पं. गोपाल मिश्र आहेत. गायनाची साथ बलवंत राय भट्ट करतील.” ही घोषणा ऐकून पंडितजींच्या चाहत्यांच्या मनात भीतीचा गोळा उठला. नेहेमीचा हमखास रंगणारा तोडी सारखा मधुर राग आळवायचा सोडून पंडितजींनी देवगिरी बिलावलसारखा असा थोडासा अप्रचलित आणि तोडीच्या तुलनेने नीरस वाटणारा राग का निवडला याचं त्यांना आश्चर्य वाटलं. आता काय होणार? पंडितजीचं गाणं रंगणार ना, अशा शंकेने श्रोते व्याकूळ झालेले असतानाच पडदा उघडला. रंगमंचावर तंबोरे छेडीत बसलेला शिष्यवृंद, तबला घेऊन बसलेले पं. अनोखेलाल आणि सारंगीवर नाजूकपणे गज फिरवणारे पं. गोपाल मिश्र श्रोत्यांना दिसले. पंडितजी आज मैफल गाजवणार याची ग्वाही त्या पहिल्या तेजःपुंज स्वरानंच दिली. त्यानंतर ते तासभर आलाप करीत राहिले. अत्यंत वजनदार आणि कसदार आवाजात विलंबित ख्यालाचे आलाप करून त्यानंतर त्यांनी आधीच्या गायक बंधूंनी जे जे प्रकार घेतले होते ते सर्व प्रकार तर घेतलेच; पण त्यानंतर त्याहून वेगळे आणि अवघड प्रकार घेऊन दाखवले. त्यानंतर खास ग्वाल्हेर घराण्याच्या बोल ताना, गमकेच्या ताना, सरगम, निरनिराळ्या बिकट लयींचे तिरपे यांचा अक्षरशः पाऊस पाडला आणि त्यानंतर द्रुत ख्याल आणि त्यानंतर तराणा सादर केला. तराणा गाताना त्यांनी बीन या तंतू वाद्याची आठवण करून देणारे स्वरप्रकार अशा कौशल्याने घेतले की जणू प्रत्यक्ष बीनच वाजतंय असा भास झाला. तीन सप्तकांना भेदून जाणाऱ्या गगनभेदी तानेचा तिरपा घेऊन त्यांनी गायन संपवलं तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.“पंडितजी की जय! वाहव्वा!वाहव्वा!” असा जल्लोष करीत श्रोते टाळ्या वाजवतच राहिले. शेवटी पंडितजींनीच आता थांबा अशी खूण केल्यावर टाळ्यांचा गजर थांबला. मग ते म्हणाले, “मी आपला आभारी आहे. माझ्यासारख्या वृद्ध आणि थकलेल्या गायकाचं जुनंपुराणं गाणं आपण इतका वेळ ऐकून घेतलंत, याचा आनंद आहे.” पुन्हा टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. मग पंडितजी मिष्किलपणाने म्हणाले, “मी आपला साधा हिंदू ब्राह्मण माणूस. मला ती सैंय्या आणि बालमाची ठुमरी येत असली तरी गायला आवडत नाही. आणि त्या ठुमरीत पाश्चिमात्य सूर मिसळणे तर मी त्याज्यच समजतो. मी आपली सूरदासाच्या भाबड्या भक्तीनं ओथंबलेली भजनंच गाणं पसंत करतो" आधीचे स्वर आणि मैफल केव्हाच पुसली गेली होती. आणि सर्वांच्या मनावर केवळ पंडितजींच्याच स्वरांचं अधिराज्य होतं मग सुरू झालेला टाळ्यांचा गजर आणि पंडितजींचा जयजयकार थांबता थांबेना आणि पंडितजी उभे राहून वाकून अभिवादन करीतच ते पडद्याआड गेले"

Комментарии •